Tuesday, February 4, 2014

कला आणि कलेचा व्यापार : संजीव खांडेकर from Choufer Samachar

कला (Art) आणि कुसर किंवा हुनर (Craft) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा व विशेषत: आपल्याकडे त्या एकच मानण्याची प्रथा आहे. दोहोंचा एकमेकाशी संबंध जरूर आहे. परंतु त्यांच्या प्रवृत्ती व प्रकृती भिन्न आहेत. पैकी हुनर किंवा क्राफ्ट चा बाजार फार जुना आहे. अर्थातच याच बाजाराने पुढे कलेच्या बाजारात कलेचे बाजरीकरण करण्याला जरा मदत केली असली तरी कलेचा बाजार किंवा आर्ट मार्केट ही नवी व स्वतंत्र संकल्पना आहे. हुनर ही मुख्यत: शिकण्यासारखी, शिकण्यासारखी, पिढ्या न पिढ्या चालत आलेली. व्यवसाय म्हणून रूढ झालेली, सांस्कृतिकरणाच्या इतिहासाची भागीदार किंवा मुख्यत: साक्षीदार झालेली गोष्ट आहे. कला किंवा (Art) चे मूळ आणि कूळ वेगळे आहे. अर्थात या लेखाचा तो विषय नाही. या लेखात आपण मुख्यत: अलिकडच्या काळातील कलेच्या बाजारीकरणाचा विचार करणार आहोत; व हा विचार सध्या तरी दृश्यकलेपुरता मर्यादित असणार आहे.
आपल्याकडे कला व कलेचा ‘वापर’ मुख्यत: संपन्न व उच्चभ्रू आणि अगदी मोजक्या लोकांच्या जीवनात दिसतो. पाश्‍चिमात्य राष्ट्रात कला आणि मार्केट मध्यमवर्गीयांपर्यंत व म्हणून तळागाळापर्यंत लवकर व सहज पोचले; व याचे श्रेय मु्ख्यत: त्या समाजात झपाट्याने विकसित झालेले औद्योगिकीकरण, भांडवलशाही व नवमध्यमवर्गाची निर्मिती अशा आर्थिक व म्हणून राजकीय कारणांकडे जाते. आपल्याकडे अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर, ग्लोबलायझेशन व माहिती व तंत्रज्ञानाचा जागतिक स्फोट झाल्यानंतर, माध्यमक्रांती झाल्यानंतर नवा मध्यमवर्ग शहरी व ग्रामीण समाजात गेला दहा पंधरा वर्षात उगवला व फोफावला. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याकडील अतिउच्च समाजाच्या दिवाणखान्यात विराजमान झालेली किंवा निवडक विचारवंताच्या बोलण्या लिहिण्यात किंचित प्रगटलेली कला (व कुसर) काही प्रमाणात व हळूहळू खाली झिरपू लागली आहे. परंतु कलेकडे पाहण्याचा, आस्वाद घेण्याचा वा तिचे रसग्रहण करण्याचा पुरेसा अनुभव आपल्या समाजाकडे नसल्यामुळे तसेच आर्ट व क्राफ्टची सरमिसळ झाल्यामुळे चांगले रसिक व समीक्षक पुरेसे उपलब्ध नसल्यामुळे तिचे (सौंदर्य) शास्त्र किंवा, बरे वाईटाचे मानदंड अजून तरी ठसठशीतपणे निर्माण झालेले दिसत नाहीत. गेल्या शतकातील गुरूवर्य रविंद्रनाथांचे शांतिनिकेतन, सुझा सारखे प्रोग्रेसिव चळवळीतील एखाद दुसरा अपवाद वगळता येथील कलेने सामाजिक व राजकीय बदललेल्या चळवळींचे किंवा येथील सामाजिक भानाकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले. व ‘कंपनी स्कूल’ कडूनच धडे गिरवायला मिळाल्यामुळे पश्‍चिम हीच पूर्व दिशा मानून कला व व्यवहाराचा प्रवास केलेला दिसतो. नेहरू, इंदिरा गांधी, लोहिया अशी तुरळक नावे वगळता राजकीय प्रवासातील बहुतेक बड्या मंडळींच्या घरातील भिंतीवर चित्राला जागा अभावानेच मिळाली, आणि या अतिविशाल देशात, प्राचीन कला परंपरा मिरवणार्‍या प्रदेशात दहा पंधरा ‘वर्षापूर्वी’ पर्यन्त म्हणजे नव्वदीच्या दशकात देखील कलादालने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच होती व आधुनिक कला संग्रहालये मूठभर देखील नव्हती.
भारतीय परंपरेच्या अभिमानावर पोसलेल्या संघ, जनसंघ, भारतीय जनता पक्ष यांनी न त्यांच्या ‘स्वाभिमानी’संघटनांनी आधुनिक कला, कलावंत यांची जेवढी करता येईल तेवढी व जिथे मिळेल तिथे मुस्कटदाबीच केलेली दिसते. वर्तमानपत्रे, मासिके आदि कलाव्यवहारांची व्यासपीठे देखील दृश्यकलेपासून कायम अंतर राखून चाललेली, व केलाच तर कलेचा उपयोग सजावटीपुरताच करण्याकडे बड्या व विचारवंत म्हणवून घेणार्‍या मासिक -वर्तमानपत्रांचा राहिला आहे. त्यामुळे अशा विकल व अशक्त पाठबळावर येथील कला गेल्या काही वर्षात अचानक कशी व कुठे फळली याचा विचार करणे मनोरंजक व एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.
मात्र अशा पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या दशकात अचानकपणे उसळलेला कलाज्वराची साथ या समाजत कशी पसरु लागली व त्या लाटेत काय तरंगले, किती बुडाले व कोण जगले वाचले किंवा मेले व वाहून गेले याची चिकित्सा करणे गरजेचे आहे. आपल्या देशात गेल्या दशकात अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदल झाले. माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्फोटाबरोबरच इतिहासाचे ओझे व म्हणून भानही नसलेली, अचानक उद्भवलेला नव्या आर्थिक स्त्रोतामुळे संपन्न झालेली, आणि Consumrnism किंवा इच्छापूर्तीच्या नवनव्या वाटा व प्रवाह शोधणार्‍या नव श्रीमंत मंडळींची एक नवी व्यवस्था येथे जन्माला आली. रिअल इस्टेट व शेअर मार्केट या ठिकाणी होणार्‍या उलाढालीतून कधीही न मिळेल व फक्त कल्पनेत दिसणारा पैसा या वर्गाकडे राजापूरची गंगा अवतरावी तसा वाहू लागला. त्याचबरोबर तो खर्च करण्यासाठी वा गुंतवण्यासाठी या समाजाला नवनव्या जागा, व तिजोर्‍या, किंवा मार्ग व उलाढाल आवश्यक वाटू लागला. पैसा कसाही मिळवावा, व तो झटपट मिळवावा या बरोबरच पैसा झटपट मिळालेला पैसा झटपट वाढावा, झटपट वाढलेला पैशातून एका बाजूला राजकीय खेळ तर दुसरीकडे ‘इन्व्हेन्ट’ चे खेळ साजरे करून चैन व चंगळ करावी. स्वातंत्र्य याचा अर्थ, मुक्त बाजारपेठ इतकाच व असाच असावा व बाजारपेठ हीच सार्‍या समाजाच्या विकासांची गंगोत्री आहे. असे मानून आपले उखळ पांढरे करणार्‍या नवमाध्यम नव श्रीमंत वर्गाची विजयी वाटचाल येथे सुरू झाली. (अशा वर्गाला ‘बाजारपेठ व विकासा’ चा महायंत्र जपणारी नरेंद्र मोदीसारखी व्यक्ती आपली न वाटली तर नवलच)
नव्वदीच्या दशकात Jcan-Francois Lyotard (-त्योत्तार?) या विचारवंताने ‘Libidinal Economy’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्यात या नवसमाज रचनेचे वर्णन करताना त्याने एका क्षणिक – (Ephemeral) त्वचेचे वर्णन केले आहे. बाजारपेठ किंवा मार्केट म्हणून जी काही नवीन भानगड गेल्या काही वर्षांत जगभराचा परवलीचा शब्द बनली आहे ती सारीच एका क्षणभंगूर ऐंद्रिय त्वचेची ताणलेला पापुद्रा असावा अशी आहे. तिचे क्षणभंगुरत्व हेच तिचे सामर्थ्य व हीच तिची मर्यादा. आणि या त्वचेला रंग, वास, स्वाद वा नाद मिळतो. तिच्यातील अमर्याद इच्छा स्त्रावामुळे ! इच्छा आणि त्यांची पूर्ती यांच्या सततच्या घर्षणातून झिरपणारा सुखस्त्राव हीच या नवसमाजाची चलनवलन घडवणारी शक्ती आहे.
आणि मार्केट-किंवा बाजारपेठ ही अशी जागा आहे जिथे इच्छा एकमेकाला भेटतात, भिडतात अ्राणि पुन:पुन्हा प्रसवतात. फे्रंच तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रीय अभ्यासक लाकां (Lacan) यांनी Ehcore किंवा पुन: पुन्हा मिळणार्‍या इच्छांविषयी भरपूर लेखन केले आहे. त्यांच्या वर्णनात या इच्छा आपण इप्सिताभोवती फिरतात असा सुंदर उल्लेख आहे. म्हणजे या इच्छा आपल्या पूर्तीच्या ध्येयाला मिळत नाहीत तर एखाद्या भूतासारख्या त्या ध्येयबिंदू भोवती फिरत रहातात. म्हणजेच या नव्या ‘मार्केट’ ने ग्रासलेल्या समाजाची इच्छापूर्ती कधीही संभवत नाही. एकाद्या अतृप्त आत्म्यासारख्या भूतप्रेत बनून आपल्याच इच्छा आपल्या जिवंतपणी लोंबकाळताना बघणे हा केवढा दुर्दैवाचा भाग आहे?!
अध्यात्मिक परंपरा, साधेपणा आणि साधू वृत्ती, संत संग आणि तात्त्विक पाया असल्याची सदैव बोंब मारणार्‍या, त्याचेच राजकारण करणार्‍या या आपल्या महान देशात मार्केटच्या आगमनाबरोबर प्रथम अध्यात्म आणि पाठोपाठ परंपरा आदिंचे क्रय वस्तूंमध्ये रुपांतर केव्हा व कसे झाले व पाठोपाठ कला, शिक्षण, चळवळ व संस्था याही कशा विकल्या व खरिदल्या जाऊ लागल्या याचे विवेचन अनेकांनी काही गेल्या वर्षांत अनेकवेळा केले आहे.
म्हणूनच लाकां या इच्छांना ‘Drive’ असे संबोधतात. ‘Drive is never fulfilled, Market is sustained and driven on such drives. And drive fuels desires…’ आणि मग अशा न संपणार्‍या व अपूर्ण राहणार्‍या इच्छांमधून नव्या किंवा नसलेल्या म्हणून अतिरिक्त (Surplus) इच्छांची निर्मिती होते. आणि त्यामुळे सतत सारा समाजच भुकेला, आसुसलेला, बुभूक्षित, लाळ गळणारा, सतत व सहज स्खलनशील होणारा बनतो. अलीकडच्या काळात वाढलेली लाचखोरी, भ्रष्टाचार, बळजबरी किंवा अशा अनेक विकारांचे मूळ या ‘मार्केट’नावाच्या महाराक्षसी व्यवस्थेत दडलेले आहे. त्यामुळे बाजारपेठ व विकासाच्या उद्घोषणा घेवून येणार्‍या प्रत्येकाकडे समीक्षक वृत्तीने व पारखून पाहण्याची आज खरे तर गरज आहे.
अतिरिक्त इच्छा आणि त्यांचे समाधान करण्याची खटपट हेच सर्व ‘मार्केट’ यंत्रणांचे मुख्य बीज असते. मार्केट मधून निर्माण होणारा पैसा सार्‍या अर्थव्यवस्थेलाच कसा ओलीस ठेवतो याचा निरंतर अनुभव आपला समाज सध्या घेत आहेच परंतु या नव्या व्यवस्थेचे प्रत्ययकारी वर्णन जेमसन या मार्क्सवादी तत्त्ववेत्याने गेल्या शतकातच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या Cultural Turn या दूरदर्शी पुस्तकात मांडले असून ते मुळातून वाचण्याची गरज आहे. पैशाची गुंतवणूक उत्पादक व्यवस्थेत न करता ती ‘मार्केट’ मधेच ओतून आभासी पैसा, आभास विकास कसा निर्माण होतो याचे विवेचन त्यांनी केले आहे. नवी भांडवली व्यवस्था त्यामुळेच उत्पादक कारखानदारी ऐवजी मार्केट आणि त्यातून निर्माण होणार्‍या व्यवस्थेवर कशी अवलंबून राहते हे त्यांनी सांगितले आहे. तंत्रज्ञानातील गगनभेदी प्रगतीमुळे हे ‘मार्केट’ चे दोर देखील वेगाने मानवी नियंत्रणातून आता सुटून ते यंत्र व तर्‍हेतर्‍हेची गणिती मॉडेल्स् यांच्या हाती गेल्याने येत्या काही वर्षात त्यांचे अनिष्ट परिणाम भयावह पद्धतीने जाणवणार आहेत यात शंका नाही.
‘मार्केट’ या यंत्रणेच्या जाळ्यात त्यामुळे केवळ काही वस्तू खरेदी विक्री च्या मर्यादित अर्थाने नव्हे तर गेल्या काही हजार वर्षांच्या इतिहासात मानवाने निर्माण केलेल्या व मानवी इतिहासाची निशाणी असलेल्या तत्त्वज्ञान व कला याही गोष्टी आल्यामुळे अचानक सारा मानवी समाज नागडा आणि चेहरा नसलेला होऊ लागला आहे. मनुष्याला तात्त्विक प्रश्‍न नसणे, आयुष्याला शरीर धर्मापलीकडे अर्थ नसणे, आणि जीवनाला वैचारिक बैठक नसणे असे बेचव व दिशाहीन आयुष्य वाट्याला येते की काय याची भीती वाटू लागली आहे. राजकारण म्हणजेच मनुष्याने उन्नत आयुष्यासाठी,समाजाच्या एकत्रित प्रगतीसाठी, युद्धखोरी संपवण्यासाठी, शांत जीवन जगण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न. पण हा प्रयत्नच ‘मार्केट’ किंवा ‘खुली बाजारपेठ’ व्यवस्थेच्या समर्थकांनी उचकटून टाकला आहे. आणि त्यातून एक नवा बिनचेहर्‍यांचा थंडवत समाज निर्मिला जात आहे.
आर्ट मार्केट या संकल्पनेने आर्ट आणि बाजार/व्यापार/ खरेदी विक्री यांच्या संबंधात आमूलाग्र बदल करून मानवी जीवनातील कलेची नाजूक जागा व तिचा ताल, तिचा पोत, तिचा डौल, आणि तिची अध्यात्मिक गरज बदलून टाकली आहे.
मागच्या शतकात 1904 मधे आंद्रे लेव्ही नावाच्या एका फे्रंच गृहस्थाने प्रथम आर्ट फंड ची कल्पना मांडली. केवळ दोनशे बारा फॅ्रन्क दहा जणांकडून घेऊन त्याने ‘La Peau De I’Ouvs’ -‘अस्वलाचे कातडे’ या नावाने फंड उभा केला. या फंडाचे ध्येय होते एका नव्या खरेदीचे. चित्रांची खरेदी. पिकासो, मातीस सारख्या कलावंताची जवळपास शंभराहून अधिक कलाकृती या फंडाने विकत घेतली. आणि कलेच्या प्रांतात एक नवा खेळ सुरू झाला. आत्तापर्यंत श्रीमंत आणि उमराव वर्ग कलाकृतींची खरेदी त्यांच्या विक्रीतून होणार्‍या नफ्यासाठी नव्हे तर ‘पैशा पलीकडले’ मानवी बुद्धी आणि प्रतिभेला सुखावणारे सुख (किंवा चैन?) म्हणून मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांवर विकसित झालेस भाषेचा अविष्कार व त्यातून होणार्‍या अध्यात्मिक वा मानसिक संवादाची गरज म्हणून कलाकृती विकत घेत असे. त्या पाहात असे, त्यावर मित्रांसोबत चर्चा करत असे, त्या पहात असे, त्यावर मित्रांसोबत चर्चा करत असे, किंबहुना त्यांच्याबरोबर रहात असे. मानवाच्या सनातन एकटेपणांवर कलाकृतींची सोबत हा उतारा होता व आहे. परंतु ‘फंड’ या नव्या कल्पनेमुळे प्रथमच मनुष्य आणि कलाकृती व म्हणून मानव आणि कला यांच्या सबंंधात पहिली फट पडली. ही फट वाढून पुढे त्याची दरी झाली, व ही दरी वाढत माणूस आणि त्याची भाषा किंवा संस्कृती यांच्यामध्ये कसा दुरावा निर्माण झाला याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोतच.
या पहिल्या आर्टफंडामुळे झाले असे की, मानवी इतिहासात प्रथमच विकत घेतलेली चित्रे ज्यांनी या फंडात पैसा ओतला त्यांच्या घरातील भिंतीवर लागणार नव्हती. कारण या चित्रांचा मालक दहा जणांनी मिळून केलेली तीन जणांची समिती खरेदीची तर अन्य विक्रीची गणिते मांडणार होते. काही जणांना तर आपण कोणती चित्रे व का घेतली हेही माहीत नव्हते, व माहीत करून घेण्यात त्यांना रस नव्हता. कारण फंडाचे उद्दिष्ट हे चित्रांच्या रसस्वाद नसून त्यांच्या संभाव्य विक्रीतून येणारा नफा हेच होते. चित्रे किंवा कलाकृती ही आर्थिक गुंतवणुकीची साधने ठरू शकतात, पैसा ठेवायची तिजोरी बनू शकतात असा नवा व क्रांतीकारी शोध या फंडामुळे मानवी कलेच्या इतिहासात लागला.
भांडवलशाहीचे समर्थक या प्रकाराला ‘लोकशाही’ पध्दतीने झालेला कलेचा (क्रय वस्तूरुप) विकास असे म्हणतात. ‘आर्ट इज जस्ट अनादर अल्टरनेटीव असेट क्लास !’ सोनं चांदी असते तशी कला आणि फंड तयार झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ज्याची एैपत पूर्ण चित्र घेण्याची नाही, त्याला आपल्या कुवतीनुसार चार पैसे आर्ट फंडात गुंतवून स्वत:च्या भविष्याची चव अमीरांबरोबर चाखायला मिळाली असा त्यांचा दावा आहे.एकदा आर्ट हा पदार्थ रसास्वादापेक्षा गुंतवणुकीचे साधन आहे असे म्हटल्यानंतर आपल्या मनात ‘कला’ म्हणून जो काही अर्थ असतो तो ‘अर्थ’ कारणात बदलला जातो.
कलेची जागतिक बाजारपेठ कशी फायदेशीर गुंतवणूक आहे हे सांगणारे कित्येक अभ्यास गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याकडेही आकड्यांची जादू दाखवणारी व वर्षभरात दामदुप्पटीने मुद्दलवाढ देतो म्हणून सांगणारे भोंदू चिट फंड गावोगावी कसे पसरले व त्यातील पैशाचे व गुंतवणुकदारांचे काय झाले याची क्लेषकारक वर्णने आपण वाचत असतोच. गाजावाजा करून भारतीय कला बाजारात उतरवलेले जवळपास सर्वच फंड गेल्या दोन-चार वर्षांत गटांगळ्या खात बुडाले परंतु त्यांच्या भ्रष्ट परंतु शिष्ट मार्गाची साधी चर्चा देखील वृत्तपत्रे माध्यमे किंवा आर्ट प्रकाराला वाहिलेली मासिके यांनी केली नाही.
जिआंगपिंग मेई व मायकेल मोझेस या न्यूयॉर्क विद्यापीठातील दोन अर्थ तज्ज्ञांनी सदबीज व ख्रिस्तिज या दोन लिलाव संस्थांच्या 1950 पासूनच्या कला लिलावाचे आकडे एकत्र करून त्यांचा एक अभ्यास केला. त्याचा परिपाक म्हणजे ‘माई मोझेस फाइन आर्ट इंडेक्स’ आजही अनेकदा या निर्देशांकाचा वापर कला बाजारपेठेत केला जातो. परंतु मुळातच असा निर्देशांक निर्माण करणे हे कितपत शास्त्रीय आहे असा प्रश्‍न आहे. व्यवहारांची, खरेदी विक्रीची अनियमित वेळापत्रके, बाजारात येणार्‍या (कला) वस्तूंच्या प्रकारातील तिच्या रंगरुपातील आणि ‘कच्च्या’ मालातील भिंन्नता, आलेल्या (कला) मालाचा उत्पादनाची तारीख या सर्व घटकांतील वेगवेगळेपण हे असा सर्वसमावेशी निर्देशांक खछऊएद बनविण्यातील प्रमुख अडचण आहे.
लिलाव व विक्री योजनेतील अनेक (कला) अर्थ सल्लागार तर प्राध्यापक केस आणि शिलर या दोघांनी बनवलेला ‘रिअल इस्टेट’ निर्देशांकच कलेच्या बाजारातील चढ-उतार नोंदविण्यासाठी पद्धत म्हणून वापरतात असे म्हटले जाते. (रिअल इस्टेट हा काय लायकीचा व प्रकारचा उद्योग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही, परंतु तेथील उलाढाली व मुक्त बाजारपेठ याविषयी कोणीतरी सविस्तर लिहिण्याची गरज आहे.) ‘स्टॅन्डर्ड ऍन्ड पूवर’ (Standard and poor) या विख्यात संस्थेने हा रिअल इस्टेट निर्देशांक व तो तयार करण्याची पद्धत अंगीकारल्यामुळे या निर्देशांकाला महत्त्व. या निर्देशांकानुसार, तो निर्माण करण्यासाठी घेतलेली चित्रे गेल्या सुमारे 130 वर्षांत गुंतवणुकीवर सतत आणि भरपूर नफा देत असल्याचे किंवा गेल्या पन्नास वर्षातील शेअर बाजाराच्या तेजीइतकीच भरारी या चित्रांनी मारलेली दिसून येते. असे सुखद आणि (कला) बाजाराची चढती कमान दर्शविणारे जरी हे चित्र असले तरी त्यात एक मेख आहे. ती म्हणजे हा निर्देशांक काही विशिष्ट चित्रांपुरता मर्यादित आहे, त्यावरून एकूण ‘कला’ हा प्रकार गुंतवणुकीसाठी किती योग्य याचा अंदाज बांधता येत नाही.
एक तर ज्या (कला) वस्तू लिलावात येतात त्याच मुळी भाव मिळण्याची खात्रीशीर शक्यता असणार्‍या असतात. त्यामुळे अशा खात्रीशीरपूर्ण विक्री किंमतीच्या अभ्यासावरून एकूण कलेचा व्यापार कसा फायदेशीर आहे. याची गणिते मांडणे गैर आहे व याच खुबीचा वापर करून किंवा शेअर बाजारातील वाईट कंपन्यांचे भाव काही काळाकरिता वरती नेऊन बाजारातील भावनांचा फायदा घेऊन ज्याप्रमाणे सट्टे वाले, दलाल व त्यांना चालवणार्‍या बड्या कंपन्या असतात. तसेच दलाल व त्यांचे ‘बोलाविते धनी’ याही बाजारात असल्यामुळे काही वेळा काही (कला) वस्तूंचे भाव अचानक वर गेल्याचे भासचित्र येथेही केले गेले आहे.
आकडे शास्त्रीय कारण द्यावयाचे तर साधारणपणे लिलावात विकल्या गेलेल्या एकूण चित्रांपैकी फक्त 0.5 % नवी चित्रे पुन्हा पंचवीस तीस वर्षांनंतर लिलावासाठी वा पैसे मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. असे एका पाहणीत आढळून आले आहे. आणि बहुतेक वेळा लिलावात झालेल्या विक्रीचा अभ्यास करून, कलेने किती घबाड हाती दिले हे सांगताना त्याच लिलावातील 99.5% चित्रांवर लोकांनी खर्च केलेले (बाजारी भाषेत गमावलेले) पैसे किती याचा ताळेबंद आपल्यासमोर मांडला जात नाही.
बर्‍याचदा कलेचा इतिहास मांडणारे अभ्यासक कलेच्या बाजारपेठेचा उगम इटलीमधील कला बाजारात सुमारे सातशे वर्षांपूर्वी, किंवा चौदाव्या शतकाच्या मध्यावर झाला अ्रसे सांगतात. परंतु कलावस्तू, चित्र, शिल्प खरेदी विक्री एवढ्या साध्या व्यवहाराला ‘मार्केट’ ही संज्ञा योग्य नाही. आजची कला बाजारपेठ अशा निष्पाप खरेदी विक्रीच्या साध्या व्यवहारांसारखी नसून एक अत्यंत योजनाबद्ध व बहुआयामी किंवा विविध हितसंबंध गुंतलेली समांतर व्यवस्था आहे. या ‘मार्केट’ ची मूळे, दुसर्‍या जागतिक युद्धानंतर अमेरिका व तिची पाश्‍चात्य मित्रराष्ट्रे यांना अचानक आलेल्या संपन्नतेत आहे. व या सर्व राष्ट्रांना युद्धानंतर कशी व किती संपन्नता येते या विषयी येथे वेगळे लिहिण्याची गरज नाही. तसेच युद्धानंतर संपन्नता येते हे माहीत झाल्यानंतर, भूक लागल्यानंतर व लागली नसता मास्लोेच्या प्रयोगात जशी कुत्र्यांच्या तोंडात हाड बघून नव्हे तर साध्या घंटेचा आवाज ऐकून लाळ सुटते, तशी या राष्ट्रांना युद्धजन्य परिस्थितीची जगात कुठेही घंटा वाजली तरी तशीच लाळ सुटते व स्वत:च्या संपन्नतेसाठी उर्वरित जगावर युद्धे लादत, साध्या भांडणांचे युद्धात रूपांतर करीत, व युद्धाचे स्वत:च्या समृद्धीत रूपांतर करीत या राष्ट्राच्या अर्थव्यवस्था अवाढव्य वाढल्या हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
ज्या ज्या वेळी अचानकपणे अर्थव्यवस्थेची बेसुमार वाढ होते, आणि अर्थशास्त्रीय नियमात न बसणारी, प्रमाणाबाहेर Disproportionate अर्थवृद्धी होते त्या त्या वेळी त्या व्यवस्थेत निर्माण झालेल्या अतिरिक्त गरजा काय आहेत, अतिरिक्त इच्छा कोणत्या आहेत, अतिरिक्त सुखसाधनांचे कोणते नवे भोग निर्माण झाले आहेत की जेथे हा नव्या पैशाचा ओघ आणि प्रवाह liquid money flow सहजपणे पुरवला आणि जिरवला जातो आहे. हे तपासण्याची गरज असते. अचानक श्रीमंत होणारे राजकारणी, अधिकारी, कंत्राटदार, त्यांच्या नवनव्या मालमत्ता, गाड्या आणि फार्म हाऊसेस, त्यांच्या पार्ट्या आणि रिचवलेली दारू, त्यांच्या शौकांचे चोचले पुरवणारे दलाल, त्यांच्या बेनामी कंपन्या व त्यांचे सर्वदूर पसरलेले जाळे, त्यांच्या निवडणूकात व लग्नसमारंभात ओतला जाणारा पैसा यांची चिकित्सा करण्याची गरज असते. कारण अशा अचानक आलेल्या पैशांच्या पुराला कालवे कोठे व कसे खणून जिरवले आहे याची माहिती घेतल्याशिवाय चोचल्यांची बाजारपेठ कशी उभी राहते. याची कल्पना येणार नाही.
कलेची जी बाजारपेठ आज आपण पाहतो ते Art Market काही एका रात्रीत उदयाला आलेली गोष्ट नाही. विसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिका आणि पाश्‍चिमात्य राष्ट्रात जी अभूतपूर्व ‘लिक्विडीटी लाट’ आली त्या लाटेच्या उर्जेमध्ये या बाजारपेठेचा पाया आणि कळस खोदला आणि चढवला गेला. समभागांची चतुर विक्री, मग पैसे इकडून तिकडे फिरवणे, मग स्वत;च्या कंपनीत ‘ऑप्शनस्’ या गोंडस नावाखाली स्वत:, मर्जीतील नोकरदार, राकारणी आणि सरकारी अधिकारी यांना (बे) कायदेशीर मार्गाने त्यांचे वाटप करणे, ताबडतोब खुल्या बाजारात त्यांची विक्री करून त्याचे दामदुप्पट पैसे ‘व्हाईट’ म्हणून स्वत:च्या खात्यात कोंबणे, ट्रेडिंग ट्रिक्स किंवा ताळेबंदातील ‘सर्जनशील प्रयोग’ म्हणून अपाल्याच कंपन्यांचे मूल्यांकन कमी दाखवणे, त्या बुडवणे, आजारी पाडणे, परत विकत घेणे व या सर्व व्यवहारात चढ्या दराने काळा व पांढरा पैसा तयार करणे, अशक्य व अशक्त अर्थशास्त्रीय मॉडेल्स बनवणे मग अशा कधीही उभ्या न राहू शकणार्‍या उद्योग धंद्यावर, वित्तिय संस्थांवर, किंवा योजना प्रकल्पांवर चढ्या भावाची भाकिते करून, निवडक माध्यमांना व माध्यमातील ओपिनियन मेकर्सना हाताशी धरून सर्वसामान्य ग्राहकाला/गुंतवणूक दाराला उद्युक्त करून त्याला अशा योजनांचे समभाग मग चढत्या दराने घ्यायला लावणे, स्वप्नांची विक्री करून किंवा गुंतागुंतीची आकडेमोड करून व्हर्च्युअल किंवा आभासी पैशांचा ओघ निर्माण झाल्याचे भासवणे अशा व अन्य अनेक चलाख, कायदेशीर व बेकायदेशीर मार्गाने समाजातील निवडक वर्गाच्या तुंबड्या भरून ‘पहा हा संपन्न नवमाध्यम वर्ग आणि त्याची घोडदौड’ अशा अर्थाची स्वगते गात जी अर्थव्यवस्था वृद्धिंगत होते, तिची वृद्धी हा फोड किंवा गाठ आहे की खरोखरच सर्व समावेशक प्रगती आहे याचा विचार करावा लागेल.
अशा व्यवस्थेत निर्माण झालेला धनओघ (Liquid money) जर योग्य कालवे खणले नसतील तर जिथे हवा तिथे आणि हवा तिथे आणि हवा तसा जाणार नाही. तो उडून जाईल ही भिती असते. आणि अशा विविध कालव्यातील अत्यंत सावकाश व हमखास खणलेला सांस्कृतिक अभियांत्रिकीचा यशस्वी प्रयोग म्हणजेच गेल्या पंचवीस तीस वर्षार्ंत निर्माण झालेले जागतिक आर्ट मार्केट होय. आपल्याकडे असा धनयोग आणि ओघ मागच्या दशकाच्या मध्यावर उफाळला आणि पाठोपाठ ज्याप्रमाणे नवमध्यमवर्गाचा शोध घेत त्यांना नवी ग्राहक पेठ म्हणून कवटाळण्यासाठी अन्य उद्योग व परदेशी पैसा येथे प्रगटला तसेच अन्य ग्राहकाभिमुख क्रय वस्तूंसारखेच आर्ट मार्केट येथेही जन्माला आले. येथील मार्केटचा आवाका, व्याप व उलाढाल अमेरिकन किंवा जागतिक आर्ट मार्केटच्या तुलनेत फारच लहान असली तरी त्याच बाजारपेठेची ही छोटी आवृत्ती आहे. त्यामुळे तिच्याकडे वेळीच लक्ष पुरवून या मार्केटमधे वावरणारे कोण आहेत, त्यांचे काय उद्योग चालतात हे समजून घेतले पाहिजे.
कलेच्या बाजार पेठेचा विचार करताना सारा थॉर्नटन या कला समिक्षिकेच्या ‘कलाविश्वातील सात दिवस’ या पुस्तकाचा उल्लेख करावाच लागेल. इकॉनॉमिस्ट आणि गार्डियन सारख्या जगातील महत्त्वाच्या वृत्तपत्र-मासिक-साप्ताहिकातून सातत्याने व अत्यंत परखड लिखाण करणार्‍या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लेखक-लेखिकांमध्ये त्यांचा क्रमांक वरचा आहे. या विदुषी बाईंनी गेल्यावर्षी कला समीक्षा विशेषत: कलेच्या बाजारपेठेची मिमांसा करणार्‍या यशस्वी पत्रकारितेच्या कारकिर्दीला रामराम ठोकला. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, एक समाजशास्त्राची अभ्यासक म्हणून कलावंत व कलाकृती यांच्या भोवती घोंगावणार्‍या आर्थिक व्यवहारांच्या गतिमान आणि व्यामिश्र संबंधांच्या वादळाचा वेध घेणे जरी आवडणारे काम असले तरी अक्षरश: अन्य शेकडो कारणे अशी आहेत की ज्यामुळे मला या कला पत्रकारितेचे काम करताना गुदमरल्याची भावना होते. म्हणून त्यांनी या विषयावर लिहिण्याचेच थांबवण्याचा निर्णय घेतला. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली आठ-दहा कारणे वानगीदाखल माझ्या वाचकांसाठी खाली देत आहे, त्यावरून कला व्यवहारातील काळी व जळजळीत बाजू स्पष्ट व्हावी. अनेकदा कला दालनातील शांत वातावरण, गंभीर चेहर्‍याचे मोजके बोलणारे समीक्षक, चित्र विचित्र पोशाख करणारे कलावंत, उंची गाड्यातून अवतरणारे कला रसिक, उद्घाटनाच्या झगझगीत पार्ट्या, गुळगुळीत महागड्या कागदावर छापलेले कॅटलॉग, महाग व अगम्य भाषेत लिहलेले लेख असणारी मासिके, न समजणार्‍या चर्चा, सुंदर व अतिमहाग ब्रॅन्डसच्या पर्स, चपला, पोशाख, चष्मा घालून आलेले तरुण तरुणी या सर्व वातावरणाचा भगभगीत उजेड पडल्याने बहुतेक वेळा आपले डोळे दिपून अंधारी येते, अशा वेळी सारा थॉरन्टोन सारख्या पत्रकारांचे विचार आपल्याला या झगमगटामधील व भवतीचा अंधार स्वच्छ दाखवतात.
१) कलेची बाजारपेठ ही अत्यंत भ्रष्ट जागा बनत चालली आहे ! सद्य काळात त्यादिवशीची मोठ्या आर्थिक उलाढालीची बातमीच तुम्ही काय व कुणाबद्दल लिहिणार हे ठरवते. त्यामुळे स्वाभाविकच ज्या कलावंतांच्या कृतीला भाव अधिक त्यांच्याबद्दलच लिहावे लागते. अनेकदा त्यामुळे ‘गोर्‍या’ कातडीच्या अमेरिकन चित्रकारांविषयी, जरी ते/तो (‘ती’ अभावानेच) ऐतिहासिक दृष्ट्या बिनमहत्त्वाचे काम करीत असला तरीही लिहावे लागते.
२) कलेच्या बाजारपेठेत होणार्‍या उलाढालीवर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण नसते. (ही कथा अमेरिका युरोपची तर आपल्याकडे काय परिस्थिती असेल?) आणि जरी तुम्ही एखादे फ्रॉड किंवा विशिष्ट कलाकृती वा कलावंतांच्या किंमती गैर मार्गाने कमी वा जास्ती करुन बाजारपेठेतील मलई खाण्याचे प्रकार उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले तर तुमच्याच प्रकाशनाचे (इकॉनॉमिस्ट?) वकील असा मजकूर गाळून त्या लेखाची सारी शक्तीच नष्ट करतात. मुख्यत: व काही विशिष्ठ देशात कलेच्या प्रांतातील खरेदी विक्री ही कर चुकवण्यासाठी, काळ्याचा पांढरा पैसा करण्यासाठी वा हवालासारखे व्यवहार करण्यासाठी माध्यम म्हणून वापरली जाते. आणि हे सारे प्रकार सुंदर सुंदर पोशाख घालून आलेल्या समस्त उच्चभ्रूंच्या साक्षीने या आंतरराष्ट्रीय लिलावात उघडपणे चालते.
३) अशा लिलांवामध्ये मुख्यत: जी निर्णायक शेवटची बोली लागते तेवढेच आकडे मुख्यत: प्रसिद्ध होतात. पण ही किंमत कशी वर गेली; कला दालनांचे मालक, विक्रेते आणि दलाल तसेच ‘स्पॅक्युलेटिव्ह’ संग्राहक यांच्या संगनमतातून ही किंमत वरती गेली नव्हे तर नेली आहे, याची माहिती व आकडेवारी कधीच प्रसिद्ध होत नाही.
४) जागतिक कला विश्‍वातील खरेदीदारांमधे नव अतिश्रीमंतांचाच भरणा आहे. हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या देशात भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणारे, अनेकदा न लोकशाही देशातून आलेले व सर्व प्रकारची मुस्कटदाबी करून अवैध व घाणेरडा पैसा मिळवून गब्बर झालेले लोक असतात. तर पाश्‍चिमात्य व अमेरिकनांमध्ये बँका बुडवलेले, तरूण फंड मॅनेजर व सार्वजनिक पैशांवर डल्ला मारून आपली पोळी भाजलेले लोक खरेदीदार म्हणून कमी नाहीत असे रशियन, अरब व चायनीज बाजारात भरपूर पैसा ओततात व त्यामुळे अधिक कलावंत, क्युरेटर, कॅटलॉग-पुस्तके लिहिणारे व अशा बाजारपेठेची मागची बाजू ‘बँक स्टेज’ सांभाळणारे यांची त्यामुळे सोय लागते. (आपल्याकडे 2005-2010 या कलेच्या उसळलेल्या काळात अशा लेखक/क्युरेटर आदि मंडळीचे परदेश दौरे, खर्च आणि जमा यांचे आकडे पाहिले तर डोळे गरगरतील.)
साराबाईंनी दिलेल्या विविध उदाहरणात आर्थिक हितसंबंधातून उर्स फिशर, ब्रान, फ्रॅन्क पिनो, ऍडम लिंडमन, लॅरी गॅगोसियन आणि मुगाबे कुटुंबिय यांच्या साट्यालोट्यातून जागतिक लिलावातील कलावस्तूंच्या किंमतीचे घोटाळे कसे घडवले जातात याची सप्रमाण कथा लिहिली होती.
५) पैकी पिनो यांची (कु) सुप्रसिद्ध म्युझियम्स् मीदेखील पाहिली आहेत. या पिनो महाशयांच्या भारतीय संग्रहात स्थान मिळवण्यासाठी येथील कला विश्‍वातील विविध घटकांनी कसे व काय प्रयत्न केले याचे किस्से दबक्या आवाजात अधून-मधून चघळले जाताना मीही ऐकले आहेत. आपल्याकडे कलावंताच्या चित्र/कृतींची किंमत अर्ध्या रात्रीत कशी गगनाला भिडली, कुणी भिडवली, ही चित्रे कुणी (व्यक्ती व संग्रहालये) विकत घेतली, का विकत घेतली, कुणी विकली यांचा हिशोब मांडण्याचे धाडस कोणाकडे आहे?
आणि अशा ‘गगनभेदी’ कलावंतांना किंमती वाढल्यानंतर जो महान असल्याचा साक्षात्कार झाला, गावोगावी सत्कार झाले, नियतकालिकांच्या गुळगुळीत पानांवर आणि पेज थ्री पुरवण्यांवर फोटो छापले गेले त्यांच्या कथा हा एक वेगळाच विषय आहे.
६) साराबाईंनी आणखी एक (क्रूर) विनोद आपल्या लिखाणात सांगितला आहे. त्यांच्या ( व इतर अनेकांच्या) पाहणी व अनुभवानुसार या गाजावाजा झालेल्या लिलावांच्या विक्रीचे गणित सामान्यत: जवळपास अनुमानित किंवा नक्कीच असते. त्यामुळे लिहिण्यासाठी नवीन असे फारसे हाती लागत नाही. या लिलावांच्या लॉट 1 ते लॉट सहा सामान्यत: तरुण व आकर्षक कलाकृतींचा, लॉट तेरा हा सामान्यपणे ‘जॅकपॉट’ किंवा गगनाला गवसणी घालणारी किंमत देणारा, लॉट 48 ते लॉट 55 साधारण धूळ खात पडलेला जुन्या चित्रांचा , जुन्या लोकांचा असे हे ठरलेले ‘मांडणी शिल्प’ असते.
७) कलेसंबंधी लिहिता बोलताना पैसा (खरेदी विक्री), किंमत, नफा, तोटा हीच मुख्य गोष्ट असते. कला विश्‍वातली विक्रीचे उच्चांक तोडणारी बातमीच पहिल्या पानावर व म्हणून कलेची नव्हे तर विक्रीची बातमी असते.
यातून अर्थातच जास्त किंमत म्हणजे चांगली कला, जास्त विक्री म्हणजे महान कलावंत अशी समीकरणे सर्वसामान्य माणसांच्या मनात व म्हणून आचरणात तयार होतात. त्यामुळे अनेकदा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे कला ‘ऐवज’ लोक, संग्रहालये व नियतकालिके यांच्या पासून दूर रहातात.
साराबाईंच्या राजीनामा पत्रातील असे अनेक मुद्दे आहेत जे वाचल्यानंतर खरे तर आपल्या समजाला धडकी भरायला हवी. परंतु सध्या एकूणच जागतिक पातळीवर एकापेक्षा एक मोठे घोटाळे सहज पचवून सस्मित उभे राहून दोन बोटे वर करून ‘V’ अशी मुद्रा धारण करणार्‍या नवश्रीमंत वर्गाची चलती आहे. वाढलेली किंमत म्हणजे महान कला व वाढलेला पैसा म्हणजे प्रगतीची वाट असे मानून मोदी किंवा सोदी अशांच्या वागण्याबोलण्याला आदर्श मानण्याची प्रथा पडत आहे. अशा व्यवस्थेत प्रश्‍न विचारायला परवानगी नसते. लोकशाहीच्या गोड पांघरुणाखाली उबदार वातावरणात (किंवा वातानुकुलीत हवेच्या झुळकीत) हुकुमशाहीची चादर आपल्या तोंडावर हळूहळू आवळण्यात येत आहे हे कोण समजणार?
कला असो वा अध्यात्म, राजकारण वा शिक्षण, समाजकारण वा मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रात आजकाल प्रश्‍न विचारलेले फारसे आवडत नाहीत. विचारले तर दुर्लक्षिले जातात. किंवा गाय दबोर (Guy Debord) या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे अशा प्रश्‍नांची एक रंजक आवृत्ती बनवून माध्यमे ती चघळत राहतात. अशा संवेदनाहीन वातावरणाचा कंटाळा येवून साराबाईंनी कला पत्रकारिता सोडली.
गेल्या पाचसहा वर्षांत- साधारण 2005 च्या सुमारास आपल्याकडे व चीनकडे ज्यावेळी ज्यावेळी ‘मार्केट’ म्हणून पाहिले गेले, त्यावेळी कलेची एक बाजारपेठ येथे निर्माण करता येईल अशी शक्यता गृहित धरून येथील कलाकृती जागतिक बाजारपेठेत मांडण्यास सुरुवात झाली. या मार्केटच्या सुवर्ण काळात वर्षाकाठी किमान तीन ते चार जागतिक कला लिलाव जवळपास प्रत्येक महत्त्वाची आंतराष्ट्रीय लिलावसंस्था केवळ भारतीय कलाकृतींसाठी करू लागली. म्हणजे वर्षाला जवळपास दहा ते बारा किमान, लिलाव केवळ भारतीय कलेसाठी लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, सिंगापूर, शांघाय, बर्लिन आदि शहरात भरू लागले. देशोदेशी भरणार्‍या ‘बिनाले-ट्रिनाले’ मधे भारतीय कलावंतांना आमंत्रित केले गेले. जागतिक कला जत्रा (Art fair) आणि अन्यत्र भारतीय कला दालनांचे स्टॉल्स दिसू लागले. खुद्द भारतात आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दिल्ली व अन्य ठिकाणी भरू लागले. पाहता पाहता भारतीय कलाकृतींचे भाव वाढू लागले. ज्या चित्रांची किंमत 2004 मधे काही हजारात होती ती काही लाखांवर पोचली. कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात उगवतात तशी नवी कला दालने उदयाला आली, ‘आर्ट डिस्ट्रीक्ट’ आणि खास कलेची दालने असलेले विभाग निर्माण झाले. दिल्ली, मुंबई , बंगळुरु, कोलकत्ता, अहमदाबाद, चेन्नई, वरोडरा, हैद्राबाद अशा व अनेक ठिकाणी नवी दालने, नवे विक्रेते, क्युरेटर, समीक्षक, इतकेच काय पण नवे फ्रेम मेकर्स, नवे कलेची वाहतूक करणारे तज्ज्ञ, विकत घेतलेला व विकण्यासाठी असलेल्या कलाकृती काळजीपूर्वक जतन करण्यासाठी गोडाऊन आणि स्टोअरेज व्यवस्थाही निर्माण झाली. कला या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली जाताच नवमध्यमवर्गीयांच्या मुला-मुलींनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इ. शिक्षणाशिवाय कला,‘कलेचा इतिहास, समीक्षा’ आदि असे नवे शिक्षणाचे दार’ उघडले जावून कला महाविद्यालयासमोर प्रवेशाच्या रांगा वाढल्या. कलेच्या क्षेत्रात उत्साहाचे वारे वाहू लागले. नवनवीन कलावंत, आठवड्याला एक दोन नव्या प्रदर्शनाची उद्घाटने, उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम, रात्रभर चालणार्‍या पार्ट्या, त्याची दुसरे दिवशी छापून येणारी सचित्र रसभरित वर्णने, विक्रीच्या अवाढव्य किंमतीच्या चर्चा, नवनवीन सेलिब्रिटीज कलावंतांची छायाचित्रे, इतकेच काय पण कुठे तरी कोपर्‍यात चालणार्‍या ‘आर्ट’ मासिकांचे जाडजूड अंक प्रसिद्ध होऊ लागले. हे अंक मजकुरापेक्षा जाहिरातीनी भरलेले आणि त्यामुळे कित्येकदा त्यातील मजकूर शोधावा लागत असे. मुक्त बाजार व्यवस्थेमुळे एवढा भरपूर फायदा झाल्यामुळे व विकासाची गंगा याच अर्थव्यवस्थेत आहे याची साक्ष पटल्यामुळे आपल्याकडील डाव्या विचारांच्या मार्क्सवादी फुलोर्‍याच्या, समाजवादी वळणाच्या वा गांधीवादी साधेपणाच्या रस्त्यावर चालणार्‍या कलावंत व त्यावर अवलंबून असणार्‍या लेखक -समीक्षक आदि सर्वच मंडळींची सुरुवातीला जरी पंचाईत झाली तरी ‘शुद्ध कला आस्वाद’ घेण्याची भूमिका घेत या सर्व मंडळींनी नव्याने आलेला व अचानक वाढलेला पैसा ‘मार्केट’ मधे उपलब्ध असलेल्या म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंडस्, जमीन, घर, इत्यादी पर्यायात गुंतवण्यावर लक्ष केंद्रित केले.
कलाकाराला पैसा मिळतोय, तर गैर काय? असे म्हणत यातील मुख्य मलिदा लिलाव संस्था व कला दालनांचे मालक आदि यांनीच गिळला असला तरी एकदा बाजारपेठीय संस्कृती स्वीकारल्यानंतर काय वेगळे घडणार होते व आहे? विमाने भाड्याने घेऊन कला प्रदर्शनासाठी ग्राहक व लेखक मंडळींना नेणे, भरजरी कार्यक्रम आखणे, पंचतारांकित जेवणावळी घालणे, उंची मद्य व नाचगाणी करणे व यातून कलेची किंमत वाढवण्यासाठी, म्हणजेच नवश्रीमंत समाजाला एक गुंतवणुकीचा नवा मार्ग व चोचला देण्यासाठी अन्य देशांसारखी येथील बाजारपेठही सज्ज झाली.
शेअरबाजारासाठी किमान नियंत्रण व्यवस्था,सेबी आदि संस्था असतात. सरकार व माध्यमे या बाजारावर लक्ष ठेवून असतात व असे असूनही ‘ऑपरेटर’ ‘पंटर’ ‘ब्रोकर’ आदि घटक तेथे कशी उलथापालथ घडवतात याचा अनुभव सार्‍या जगाने अनेकदा घेतला आहे. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘सब प्राईम’ ने कसा घोटाळा केला, जगभरच्या बँका व उद्योग कसे कोसळले यांच्या कथा व व्यथा सांगणारे टनभर साहित्य प्रसिद्ध झाले आहे.
कलाबाजार पेठेवर कुणाचे नियंत्रण आहे? एखाद्या हजारात विकल्या जाणार्‍या कलाकृतींचे मोल एका रात्रीत काही कोटी कसे झाले, कुणी केले, कसे विकले असे प्रश्‍न विचारणारी कोणतीही सरकारी वा अन्य संस्था नाही. या बाजाराचा अधिकृत निर्देशांक नाही. साहजिकच ‘भय सरले, लज्जा संकोच सर्व गळले’ असे म्हणणार्‍या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील ब्राम्हणाची जी अवस्था तसाच चळ येथील पात्रांना न लागला तर विशेषच.
माझ्या माहितीतल्या एका गडगंज माणसाने एकाच कलाकाराची‘गॅलरी’ ने सांगितले म्हणून चाळीस चित्रे विकत घेतली होती. तो कलावंतही असा कलंदर, त्याने चाळीस चित्रे साच्यातून गणपती काढावेत तशी काढली, लाखोंच्या किंमतीने ती विकली. पुढे शेअरबाजार पडला, जागतिक मंदी आली व इथले कलेचे वारे पडले तशी या चित्रांना कोणी विचारणारे राहिले नाही. दरम्यान ती गॅलरी बंद पडली. गॅलरीचे उच्चभ्रू मालक जे सदैव कलावंत व अन्य उच्चभ्रू गिर्‍हाईकांच्या गर्दीत असत ते अदृश्य झाले. त्यांनी जमीन विकसकाच्या नव्या धंद्यात उडी मारली. ज्याने ही चाळीस चित्रे घेतली त्याने ती घेतल्यानंतर साधी उघडूनही पाहिली नव्हती. ज्या चित्रांसाठी त्याने काही कोटी रुपये खर्च केले त्यांचे काही लाख तरी मिळतील का या प्रश्‍नाने त्याला ग्रासले आहे. थोडक्यात काय तर नियंत्रण नसलेल्या या बाजारात उतरण्यापूर्वी अशा कथा ऐकायला हव्यात.
एका आंतरराष्ट्रीय लिलावात एका भारतीय आर्ट फंडच्या सुत्रधाराने आपल्या मालाच्या किंमती वाढाव्यात म्हणून चढ्या दराने चित्रांवर बोली लावली. पण मुख्य अर्थव्यवस्थाचं दोलायमान झाल्यामुळे त्याच्या चढ्या बोलींवर बोली न झाल्यामुळे त्यालाच ही चित्रे विकत घेण्याची वेळ आली. त्याने पैसे न दिल्यामुळे ही चढ्या बोलींची चित्रे तेथेच निशब्ध अवस्थेत आजही लटकून आहेत असे म्हणतात. या आर्ट फंडचा पुरता बोजवारा उडाला, आज विविध खटले आणि कब्जे त्यावर प्रलंबित आहेत. गुंतवणुकदारांचे पैसे बुडाले आहेत.
कला बाजारपेठेवर लिहावे तेवढे कमीच आहे. पण मग अशा परिस्थितीवर उपाय काय? ‘फसवणूक व हावरटपणा’ हा मुक्त बाजारपेठेबरोबर येणारा ‘बाय प्रॉडक्ट’ आहे. पण सुज्ञ मंडळींनी याचा अतिरेक होणार नाही हे पाहिले पाहिजे. अशा गैर गोष्टींवर कोणत्याही व्यासपीठावर बोलले जात नाही. कारण एकमेकांचे हितसंबंध आड येतात. पण असे बोलले/ लिहिले गेले, चर्चा घडली तर साहजिकच बाजारपेठेतील वाईट गोष्टींना आळा बसायला मदत होईल.
अनेक चांगल्या गॅलरीज, चांगली कला दालने, चांगले समीक्षक, चांगले क्युरेटर्स, महान कलावंत, चांगले संपादक याच बाजारपेठेत, याच कलाक्षेत्रात आहेत. बाजारपेठेनेच आणि जागतिक अभिसरणाने कलेला किंमत आली याचे भानही सर्वांना आहे. परंतु चांगल्याची सर्वच क्षेत्रात सध्या पिछेहाट होण्याचे दिवस असल्याचे मी हे सर्व लिहिण्याचा खटाटोप व धाडस केले.
काही वर्षांपूर्वी एका संध्याकाळी त्यावेळचे लोकसत्ताचे संपादक व माझे मित्र कुमार केतकर यांच्या घरी मी गेलो होतो. चेंबूर ते ठाणे असा प्रवास हायवेने न करता मी शास्त्री रोडवरून करत होतो. या छोट्याशा प्रवासात एका पाठोपाठ एक असे किमान आठ दहा भव्य मॉल्स मला लागले. वाटेत आणखी काही नव्या मॉल्सचे बांधकाम सुरु होते. हजारो नवनव्या निवासी संकुलांचे काम सुरु होते. मी त्यांच्या घरी पोचल्यानंतर माझ्या प्रवासात पाहिलेल्या यातल्या ‘लॅन्डस्केप’ चे वर्णन त्यांना ऐकवले व महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रवास करताना आपला भवतालाचे बदललेले रुप यावर आम्ही बोलू लागलो. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, हे सर्व पाहून दिपून जायला होतेच, पण डोळ्यावर अंधारी आल्यासारखे वाटते, छाती दडपून जाते.’
ज्या नव श्रीमंत मध्यम वर्गाच्या क्रयशक्तीच्या खरेदीवर व क्षमतेवर हे सर्व अवलंबून आहे, ती क्रयशक्ती मार्केटच्या धमन्यांतून वाहणार्‍या परदेशी भांडवलावर व येथे निर्माण होणार्‍या उत्पादन व्यवस्थेवर अवलंबून आहे. आज एक आकर्षक चित्र निर्माण करून मध्यमवर्गीयांच्या रक्तवाहिन्यात मोह, लोभ आणि इच्छा आकांक्षांचे सुखद रस पाझरवण्यास ही अवस्था यशस्वी झाली आहे. परंतु पुढे येणारा पैसा जर पुन्हा ‘मार्केट’मध्ये लुटूपूटीचे डाव खेळण्यासाठीच वापरला व फिरवला गेला तर भयावह आर्थिक व सामाजिक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. या मॉल्सवरचा झगमगाट येत्या पाच वर्षात उतरलेला दिसेल. आणि जवळपास तेच घडताना दिसत आहे. अनेक मॉल्स, डान्स बार, नाईट कल्ब, थिएटर्स येथील गर्दी ओसरताना दिसू लागली आहे. गल्लोगल्ली फोफावलेले ‘डिझायनर’ कपडे दागिने विकणार्‍यांचे तण माना टाकून गाशा गुंडाळू लागले आहे. बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे जागोजागी अर्धवट उभ्या असलेला इमारतींचे सांगाडे येणार्‍या काळाकडे प्रश्‍नार्थक मुद्रेने पाहू लागले आहेत. सरकारी पातळीवर उपाय व योजनांनी आपापली परिसीमा गाठली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पैसा हद्दपार झाल्याने व ओढून ओढून खाल्याने या क्षेत्रातील इस्पितळे, शिक्षण संस्था आदि गोरगरिबांसाठी असलेली यंत्रणा हतबल झाल्या आहेत. या अशा प्रत्येकच गोष्टींवर स्वतंत्र व सविस्तर चर्चा/ लिखाण करता येईल. मुद्दा एवढाच की या परिस्थितीचे प्रतिबिंब कलेच्या बाजारपेठेत न पडणे कसे शक्य आहे?ते तसे पडले. वर्दळ कमी झाली.स्टॉल्स उठले. ठिकठिकाणच्या ‘डिलर व्हिलर’ नी आपले गाशे गुंडाळले. कलावंताचे नवे स्टुडिओ बंद झाले. कलादालने मिटली. जागोजाग पेटलेले प्रदर्शनांच्या उद्घाटनाचे रात्रभर जळणारे लाईटस विझले, आणि आयटम सॉंग टाईप पाश्‍चात्य रिदमवर थिरकणारी तेथील पावले व लचकणार्‍या कंबरा स्थिरावू लागल्या. असे जरी असले तरी त्या त्या समाजातील ‘सुपर रिच समुदाय’ आणि ‘अति श्रीमंत वर्ग’ अशा कोणत्याच लाटेत बुडत नाही असा इतिहासाचा अनुभव आहे. आणि कला काय किंवा फॅशन काय हे दोन्ही उद्योग जवळपास एकाच मापदंडाने मोजण्याची या वर्गाची पध्दत आहे. एल व्ही ची लक्ष लक्ष रुपयाचंी छोटीशी पर्स, कार्टियरचे दहा लक्ष रूपयांचे मोबाईल फोनचे मॉडेल किंवा या व अशाच ब्रॅन्डचे कोट्यावधींचे रोज वापरले जाणारे पट्टे, बूट, मोजे आदि सामान, गाड्या किंवा परफ्यूमच्या बाटल्या यांच्या बरोबरच हुसेन किंवा भारती खेर, रामकुमार तय्यब किंवा जितिश कलट आणि कुणीतरी यांच्या कलाकृती आपल्या तळघरातील गोडावून मधे आहेत यामुळे अशा वर्गाला ऐंद्रिय सुख मिळत असतेच. ते आजही मिळत आहे यात शंका नाही. एवढेच की या ‘सुपर लक्झरी’ बाजारपेठेत नव्याने शिरलेला नव श्रीमंत मध्यमवर्गाची अवस्था सध्या भांबावून गेल्यासारखी झाल्याने येथील गर्दी आटल्यासारखी दिसते आहे.
ते वाट पाहात आहेत एका छोट्या, मग थोड्या मोठ्या व पाठोपाठ येणार्‍या भल्या मोठ्या लाटेची. ज्या लाटेमुळे बाजार उसळेल. तेजी सळसळेल. मार्क्सने सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या ‘बूम आणि बस्ट’ बद्दल लिहून ठेवले होते. आत्ता प्रतिक्षा आहे ती बूम ची. मग पुन्हा खेळाला सुरूवात आणि आता सार्‍या जगावर निरंकुश राज्य करणार्‍या नवनूतन भांडवली जगतात अशा लाटेबद्दल ब्र काढणेही शक्य नाही. त्यामुळे या खेळाची बेभान आणि बेफाम धुंदी औरच असणार आहे. अर्थव्यवस्थांच्या सुवर्णकाळात कला आणि कुसर, कला आणि कलावंत त्यांच्या अत्युच्च निर्मितीमधे मग्न असतात. ही भरभराट एवढी जादूई आणि विलक्षण प्रतिभेची असते की जिथे व्हॅन गॉगचे कष्टकरी शेतकर्‍यांचे विदीर्ण बूट देखील फॅशन बनून पादत्राणांच्या बहुमजली मॉल्समधे सहज फिट होतात.

संजीव खांडेकर
९३२३४६९८२४From http://www.choufer.com/samachar/?p=31

No comments:

Post a Comment