Tuesday, February 4, 2014

भारतीय कलाव्यवहार ८५०० लोकांपुरता? - Abhijeet Tamhane from Loksatta

भारतीय दृश्यकला-व्यवहार आजघडीला फक्त ८५०० माणसांपुरता मर्यादित आहे, असे काहीसे धाडसी विधान जगभरातील तीन महत्त्वाच्या कलाव्यापार-मेळ्यांचे संस्थापक आणि संचालक सँडी अँगस यांनी गुरुवारी दिल्लीच्या 'इंडिया आर्ट फेअर' या कलाव्यापार मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. मात्र, इंडिया आर्ट फेअरच्या संचालक नेहा कृपाल यांनी भारतातील मध्यम आणि लहान शहरांमध्ये चित्रकलाव्यवहार वाढतो आहे आणि त्याचे प्रतिबिंब दिसणारच असा आशावादी सूर लावला, तो सर्वानाच मान्य झाला.
इंडिया आर्ट फेअरचा पसारा यंदाच्या सहाव्या वर्षी, ९१ लघुदालने, त्यांत एक हजार दृश्यकलावंतांच्या कलाकृती तसेच याखेरीज २४ निवडक कलाकारांच्या मोठय़ा कलाकृती इतका वाढला आहे. भारतभरच्या साठ शहरांमधून या मेळ्यासाठी प्रेक्षक येतात, त्यापैकी अनेकजण त्या त्या शहरांत आर्ट गॅलरी चालवणारे, चित्रकलेचा अभ्यास करणारे लोक आहेत.
या मोठय़ा शहरांमध्येच भारतीय कलाव्यवहाराची व्याप्ती वाढवण्याची क्षमता आहे. मेळ्याला येणारे या शहरांतले लोक, हीदेखील आमची ताकदच आहे, असे निधी कृपाल म्हणाल्या. भारतीय कलाव्यवहाराबद्दल सँडी अँगस यांनी केलेल्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.
अँगस हे हाँगकाँग, लंडन आणि इस्तंबूलमधील कलामेळ्यांचे संस्थापक आहेत. त्यांनी 'फक्त ८५०० लोक' हा जो हिशेब लावला, त्यामागे या तीन आंतरराष्ट्रीय कलामेळ्यांसाठी किती भारतीय येतात आणि त्यापैकी किती चित्रकार, गॅलरीचालक, प्रदर्शन-नियोजक (क्युरेटर) 'कामाचे' आहेत, एवढेच गणित होते. मात्र, नेहा कृपाल यांच्या मते, हा फक्त खरेदीविक्रीचा मामला नाही. कलेची बाजारपेठ आम्हाला वाढवायची आहेच, परंतु आजची दृश्यकला आनंद देते आहे, हे लोकांना कळणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा कलेचा केवळ व्यापारमेळा नसून उत्सवदेखील आहे.
दुसरीकडे, दिल्लीच्या या मेळ्याने आंतरराष्ट्रीय बाजार वाढविण्याची सावकाश, परंतु सशक्त सुरुवात केलेली आहेच. चीनशी या मेळ्याचे संबंध वाढताहेत आणि वाढणार आहेत. त्यासाठीच, 'चायना आर्ट फाउंडेशन'चे संस्थापक आणि त्या संस्थेतर्फे १९९८ पासून चीनच्या कलाव्यवहाराशी संबंधित असलेले फिलिप डॉड हे दिल्लीत १० चिनी कलासंस्थांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन आलेले आहेत.
मुंबईतील 'गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड'च्या संचालक शिरीन गांधी यांनीही दिल्लीच्या या व्यापारमेळ्याच्या एक भागीदार या नात्याने, उद्घाटनपर वार्ताहर-बैठकीत मनोगत व्यक्त केले. 'दिल्लीत २००६ साली झालेल्या पहिल्या आर्ट फेअरबद्दल (तेव्हा त्याला आर्ट समिट म्हटले जाई) मी साशंक होते. पण यात माझी चूकच झाली, हे त्या मेळ्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझ्या लक्षात आले.' असे सांगून त्यांनी या मेळ्याच्या यशस्वी वाटचालीचे वर्णन केले.
दिल्लीच्या ओखला भागात गोविंदपुरी मेट्रो स्थानकालगतच्या 'एनएसआयसी व्यापार-प्रदर्शन संकुला'त हा मेळा शुक्रवारपासून सर्वासाठी खुला होत आहे. अर्थात, त्यासाठी नाममात्र प्रवेशशुल्क आकारले जाते.

Published: Friday, January 31, 2014

From Loksatta http://www.loksatta.com/desh-videsh-news/india-art-fair-begins-in-delhi-360194/
 

No comments:

Post a Comment